Tuesday, May 1, 2012

"महाराष्ट्र दिन"

आज १ मे ,२०१२ . महाराष्ट्र दिन. अखिल मराठी बांधवांसाठी अभिमानाचा दिन. कारण बरोबर ५२ वर्षांपूर्वी म्हणजे १९६० साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण बोलण्यास जितके सोप्पे तितक्या साध्या सरळ रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नाही. तर अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडून, अनेकांना तुरुंगवास भोगवून , बरेचसे लांच्छनास्पद बोलणे सोसून हे सगळे घडले.मोठी चळवळ उभारावी लागली तेव्हा कुठे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. आमुचा महाराष्ट्र म्हणजे मत्त राजकारण्यांशी झुंज देऊन , खेचून आणलेली विजयश्री आहे.

हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हा घटनेने इंग्रजांनी केलेली प्रांत रचनाच स्वीकारली ती अवघ्या देशाला ,खासकरून दक्षिण्यांना रुचली नाही. तेव्हा सरकारने फाजलअली आयागोची ,राज्य पुनर्रचनेसाठी नियुक्ती केली.पण या आयोगाने मराठी भाषिकांवर फारच अन्याय केला. मुंबई, बेळगाव,कारवार,विदर्भ,निपाणी,डांग,बिदर अशा साऱ्या प्रांतांना महाराष्ट्र राज्यापासून वेगळे करण्यात आले. कारणे काय तर म्हणे मुंबईचा विकास गुजराती बांधवांनी केला आहे त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ती गुजरातेत राहणे योग्य आहे. बेळगाव हे कर्नाटकाला आर्थिकदृष्ट्या जोडलेले आहे आणि विदर्भ महाराष्ट्रात टाकला तर नागपूरचे महत्व कमी होईल. म्हणजे एकीकडे भाषावार प्रांतरचना असे ओरडायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र प्रांताची शकले उडवायची. झाले , मराठी जनता पेटून उठली आणि एक "संयुक्त महाराष्ट्र चळवळ " उभी राहिली. चळवळीचे घोषवाक्य होते "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे".

तेव्हाचे राज्यकर्ते होते "काँग्रेस". त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील साऱ्या काँग्रेस नेत्यांनी हात वर केले. मग या चळवळीचे नेतृत्व केले ते सेनापती बापट,आचार्य अत्रे,श्रीपाद डांगे,एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे अशा थोर व्यक्तींनी. सेनापती बापटांचे काय ते जळजळीत बोलणे, आणि तितकीच अत्र्यांची खोचक टीका , प्रबोधनकारांचे काठीचे रट्टे ओढावे तसे लिखाण याने तेव्हाचे राज्यकर्ते तर नक्कीच जायबंदी झाले असणार. असे म्हणतात की कुठल्याही पक्षाच्या अथवा एखाद्या सत्ताधीशाच्या पाठिंब्याशिवाय , मदतीशिवाय उभी राहिलेली ही पहिलीच चळवळ होती. लोकांनीच उभी केलेली , जनशक्ती काय असते ती दाखवून देणारी ही एक भव्य चळवळ होती.

तिकडे नेहरू, मोरारजी देसाई यांसारखे राज्यकर्ते नकाराच्या हट्टाने पेटलेले तर इकडे महाराष्ट्रीय जनता होकारासाठी तितकीच चवताळून उठलेली. मुंबईत झालेल्या एका सभेत तर मोरारजी देसाई म्हणाले "काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." , तेव्हाच आणखीन एक नेते स.का. पाटील म्हणालेले "पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." पण मराठी जनतेचा निश्चय सुद्धा काही वाऱ्यावर डोलणाऱ्या डोलकाठी प्रमाणे नव्हता तर तो एखाद्या उत्तुंग पर्वत शिखराप्रमाणे पाय या जमिनीत रोवून उभा होता.

आधीच सरकारच्या पक्षपाती धोरणांतून जनतेत प्रक्षोभ होता त्यात भर म्हणून सरकारने १९५६ साली मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले. त्यामुळे तर संतापाचा अधिकच भडका उडाला. लोक रस्त्यावर उतरले. उपोषणे, सत्याग्रह, मोर्चे, आंदोलने होऊ लागली. मोरारजी देसाईनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करवला त्यात एकूण १०५ जण हुतात्मा झाले. आता सारे महाराष्ट्रीय इरेला पेटले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला. जनतेचा असंतोष इतका वाढला होता की महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे.

अशात १९५७ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस यश मिळाले काँग्रेसची बरीच पडझड झाली. जनतेचा वाढता प्रक्षोभ आणि त्याचे सरकारवर वाढणारे दडपण , आगाऊ होणाऱ्या निवडणुकांचा विचार या सर्व पार्श्वभूमीवर शेवटी सरकारला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मान्य करावाच लागला. या नुसार विदर्भ,मुंबई असे प्रांत महाराष्ट्रात आले. मुंबई , गुजराती बांधवाना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून ५० कोटी व्याज देऊन महाराष्ट्रात आली. बेळगाव, कारवार ,निपाणी मात्र शेवटी महाराष्ट्रात येऊ शकले नाही. तो प्रश्न अजूनसुद्धा टांगणीवर असल्याचे आपण पाहतच आहोत.

शेवटी राज्याचे नाव "महाराष्ट्र" असे निश्चित करण्यात आले आणि त्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी करण्यात आली.

असा हा इतिहास इथल्या शब्दमर्यादेपायी थोडक्यात मांडला पण असा हा सारा इतिहास कालपरवापर्यंत मलासुद्धा ठाऊक नव्हता. पण एकदिवस असेच google वर कोणत्यातरी कारणाने महाराष्ट्र चळवळीचा पत्ता लागला आणि मग शोध घेतल्यावर बरंच ऐकायला आणि वाचायला मिळालं आणि वाटलं की खरच माझ्या पिढीला या लढ्याची जास्त माहिती वा जाणीव असेल का? कारण आजच्या छानछोकीच्या जमान्यात कोण कशाला इतिहासाची दारे ठोठावेल आणि विचारेल की खरच का आमचे वारसदार असे लढले असा उज्वल इतिहास खरच का घडला? १ मे म्हणजे नाहीतरी उन्हाळ्यातलाच दिवस ,तेव्हा मस्त एक छान सुट्टी मिळते झाले. बाकी कशाला काय करायचे आहे. पण असा विचार किती शुल्लक आहे हे तेव्हाच कळते जेव्हा हे सारे अनुभवता येते, सोसले जाते. सुदैवाने आपल्याला असा काही जास्त त्रास सोसावा लागत नाहीये. छान जीवन जगता येतं आहे. तेव्हा त्या हुतात्म्यांची , त्या संघर्षाची या दिवसाच्या निमित्ताने निदान आठवण तरी काढू , त्यांना क्षणभर सलाम तरी करू, त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना धन्यवाद तरी देऊ आणि त्यांना मनोमन हे तरी सांगू की "मला तुमचा अभिमान आहे" . त्यासाठी केलेले हे थोडेसे लेखन. शेवटी एकच म्हणेन,

"जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा "





genius_pankaj





No comments:

Post a Comment