Saturday, June 2, 2012

मास्टरपीसच्या शोधात...



असे कधी होते का, की तुम्ही काहीतरी लिहिता, एखादी कलाकृती सादर करता, एखादे गाणे म्हणता किंवा एखादा पदार्थ बनवता, त्यावेळी वाटतं की काय झकास जमले आहे पण मग काही दिवसांनी वाटतं की अरे जे काही करायचे होते ते हे नव्हे. कुठेतरी काहीतरी राहून गेले आहे. मनात अशी एक सुप्त संवेदना उमटते की हवे तसे नाहीच जमले. आपणांस हवे ते हे नाहीच किंबहुना आपण ज्या गोष्टीच्या शोधात आहोत ते हे नक्कीच नव्हे. तो मास्टरपीस अजून गवसला नाहीच .

माझेतरी असेच होते कधीकाळी काही लिहिले की वाटते अरे शिरवाडकर,खांडेकर आपल्यासमोर काहीच नाहीत. पण नंतर काही दिवसांनी वाटते की काय शुल्लक दर्जाचे लिहिले आहे. मग मनात विचार येतो की मोठमोठ्या हस्तींना सुद्धा असा प्रश्न पडत असेल कातर हो खरच पडत असणार एखाद्या एम. एफ. हुसैन सारख्या चित्रकाराला वाटतच असणार मास्टरपीस अजून चित्तारलेला नाही किंवा एखाद्या लतादीदी सारखीला वाटतच असणार की अजून तो मास्टरपीस म्हणावा असा सूर गवसलेला नाही. 

खुद्द तानसेनाची एकदा बादशाहने स्तुती केली होती आणि म्हटले होते की वाह तुझी गायकी काही औरचतेव्हा तानसेन म्हणाला होता की छे हे काहीच नाहीमी इतके गायलो आणि गातो आहे पण माझ्या गुरूंचा जो सूर लागतो तो अजून मला जमलेला नाही आणि हे फक्त गायकीच्या बाबतीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात अनुभवायला मिळते. मी शांता शेळके यांच्या कविता वाचून हरखून जायचो. इतक्या अत्युत्तम कविता की भान हरपायचे. पण एकदा त्यांचेच बोलणे ऐकून मी चाट पडलो. त्यांना कुणीतरी विचारले की इतक्या उत्तम कविता तुम्हाला कशा जमतात. तेव्हा त्या म्हणाल्या या कसल्या कविताआपण करतो त्या केवळ रचना असतातशब्दांची बांधाबांध, खऱ्या कविता फक्त संतांनाच जमतात. म्हणजे परत तोच भावपरत तीच अपूर्णत्वाची जाणीव. 

असे का बरे होत असेल कितीही केले तरी अपूर्णत्व का जाणवावे. मला वाटतं हे अपूर्णत्वच काहीतरी अजून उत्कृष्ट करण्याची प्रेरणा करत असावे. देवाने हा अपूर्णत्वाचा जणू आशीर्वादच दिला असावा. पहा ना कुणीतरी म्हटलंच आहे की एखाद्या पर्वताच्या शिखरावर चढल्यावर पुढे काहीच नसतेअसलीच तर खोल दरी असते. म्हणून माझ्यामते तरी हे अपूर्णत्व माणसाला त्याच्या यशाच्या अंतिम शिखरावर न नेता नित्य यशाकडे जाणाऱ्या त्या मार्गावर ठेवत असावे आणि मग हेच अपूर्णत्व नवनवीन काही उदयास आणत असावे. किंबहुना हे अपूर्णत्वच माणसाच्या अस्तित्वाचे जिवंतपणाचे द्योतक असावे.

एकदा का तो मास्टरपीस गवसला की संपलेच सगळे. कारण पुढे मग काहीच करावयास उरणार नाही.जसे पुराणात म्हटले आहे की अमृतसेवन एकदा केले की मग कुठल्याच रसाची गोडी लागत नाही. तसेच एकदा का आयुष्यातला मास्टरपीस गवसला की पुढे काहीच करण्याची इच्छा राहणार नाही . पण असे कधी प्रत्ययास आले नाही म्हणून तर हे जग चालले आहे. रोज नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, रोज नवी साहित्य निर्मिती होत आहे, रोज नवे शोध लागत आहेत रोज काही ना काही उदयास येतच आहे. 

इतरांचे यावर काय मत असेल मला ठाऊक नाही पण मला तरी असे वाटते की तो मास्टरपीस ते पूर्णत्व क्वचितच कुणास लाभत असावे. नाहीतर एरव्ही प्रत्येक मनुष्य अथ पासून इति पर्यंत चाल चालत असतो त्याच्या आयुष्यातील मास्टरपीसच्या शोधात...






genius_pankaj

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. हो बऱ्याच वेळी असे होते आणि मग स्वतःवरच्या त्यावेळच्या पोकळ अभिमानावर हसू येते :)

    ReplyDelete